
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करून निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना निकष न पहाता प्रत्येकी पंधरा हजार रुपये दिले त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना विनाअट प्रत्येकी ५० हजारांची मदत करावी. तसेच शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.

मारूती भापकर यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यासह महाराष्ट्रात यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यभरातील सुमारे ६५ लाख हेक्टर वरील पिके अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत. एनडीआरएफचे निकष बदलुन त्याच्यापुढे जाऊन त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी सुमारे रु.३०,००० चे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष न पाहता प्रत्येकी १५ हजार रुपये खात्यावर जमा केली त्याप्रमाणे आता या लाडक्या शेतकरी भावांना कोणतेही निकष न लावता तातडीने प्रत्येकी ५० हजार रुपये खात्यावर जमा करावेत त्यानंतर पंचनामे करावेत.

यावर्षी अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, कोल्हापूर सातारा सांगली पुणे कोकण यासह संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक करणारा पाऊस पडला आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, बाजरी, मूग, फळबागा प्रचंड नुकसान झाले आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके नष्ट झाले असून, शेतातील माती खरडून वाहून गेली आहे. विहिरी बुजल्या आहेत. मायबाप सरकार कडुन यावर तातडीने कुठलेही उपाय होताना दिसत नाही.

प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी ५ हजार कोटी रुपये जिल्ह्यात येऊन त्यातील केवळ तीनशे कोटी खर्च झाले. ४७०० कोटी शिल्लक असल्याची माहिती मिळते. अशीच अवस्था प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात सर्वत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोबीने शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करा, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून, एनडीआरएफचे निकष बदलण्याची शिफारस केंद्राला करण्यात यावी.

पीक विम्याचे निकष बदलणे, व ते सुलभ करून पिक विमा कंपन्यांची श्वेतपत्रिका काढणे. त्याचबरोबर ओल्या दुष्काळासाठी नुकसान भरपाईची पूर्वीची असणारी एकरी रक्कम वाढती महागाई लक्षात घेता किमान दहा पट वाढवा व शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचवा. या सर्वासाठी आर्थिक टंचाई सांगण्याचे कारण नाही कारण शासनाच्या जाहिरातीसाठी, वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी चार पाचशे कोटी रुपये खर्च शासन करते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च करतात, देवाभाऊ नावाच्या जाहिरातीवर कोट्यावधी खर्च केला जातो. मग शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये देताना आता आर्थिक टंचाईचे कारण सांगू नका.

कारण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस एकीकडे साजरा करत असताना दुसरीकडे त्याच दिवशी किमान १५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. म्हणजे देशात तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या सरासरी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवायचे असल्यास ताबडतोब निर्णय घेणे. त्यामुळे जगाचा पोशिंदा बळीराजाला वाचवण्यासाठी सरसकट कर्जमाफी व तातडीच्या भरीव मदतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण वरील सर्व निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने घ्यावेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group