पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. भेटवस्तू देण्याची परंपरा बंद करणारे भाजपवाले नास्तिक असल्याचा आरोप देखील होत होते. सर्वच स्तरातून होत असलेल्या टिकेमुळे सत्ताधाऱ्यांनी आज सर्व गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रशासकीय स्तरावर शक्य न झाल्यास सर्व नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री किंवा तंबू ही उपयोगी असणारी वस्तू वारकऱ्यांना भेट स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी यावेळी जाहिर केले.
महापौर कार्यालयात झालेल्या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, तसेच वारकरी सांप्रदायातील बापू महाराज मोरे चालक टाळगाव चिखली दिंडी सोहळा, बाळासाहेब हरगुडे, अशोक मोरे, उत्तमराव साने, रमेश मोरे, बाळासाहेब साने, गणपत आहेर, बाळासाहेब मोरे, दत्तात्रय भालेकर, नारायण बोऱ्हाडे, डी.डी.फुगे, कांतीलाल साने, अरूण दाभाडे आदी उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले, न्यायालयाच्या आदेशामुळे यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यास अडचण निर्माण झाली होती. मात्र आज सर्व गटनेते, प्रशासन यांच्याशी चर्चा करून भेटवस्तू देण्याचा निर्णय झाला आहे. प्रशासनाला या वस्तू खरेदीत अडचण येत असेल तर सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या मानधनातून ही भेटवस्तू खरेदी करा असा आदेश प्रशासनाला दिला असल्याचे ते म्हणाले. उरलेले दिवस आणि बाजारातील उपलब्धता त्यानुसार ताडपत्री किंवा तंबू खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान होत झालेल्या विलबांमुळे वारकरी बांधवासमोर महापौरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात भेटवस्तू देऊन स्वागत केले जाते. गेल्या दोन वर्षापासून या भेटवस्तू खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. दरम्यान न्यायालयाने देखील ही भेटवस्तू देण्याबाबत नकार घंटा दिली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना भेटवस्तू मिळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र होत असलेल्या टिकेमुळे सत्ताधारी भाजपाने भेटवस्तू देण्याचा निर्णय घेत परंपरा कायम ठेवली आहे.