हिंजवडी (Pclive7.com):- बेदरकारपणे जाणाऱ्या मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.१०) हिंजवडी-माण रोडवरील पांडवनगर चौकात हा अपघात झाला. अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे पुन्हा एकदा एका निर्दोष जीवाचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

भारती राजेशकुमार मिश्रा (३०, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिक्सरचालक मोहम्मद अब्बास अल्ताफ (२५, रा. चांदे, ता. मुळशी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती मिश्रा या सौंदर्यविशारद असून, स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत होत्या. दरम्यान, त्या होम सर्व्हिस देण्यासाठी शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून हिंजवडी-माण रोडने जात होत्या. पांडवनगर चौकातील स्ट्रीट ऑफ युरोप परिसरात समोरून येणाऱ्या मिक्सरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. भारती यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या आणि मिक्सरच्या चाकाखाली आल्या. डोक्यावरुन मिक्सरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालक मोहम्मद अब्बास अल्ताफ हा मिक्सर जागेवरच सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चालकाला काही तासांत ताब्यात घेतले. भारती यांचे पती राजेशकुमार मिश्रा यांनी फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.






















Join Our Whatsapp Group