पिंपरी (Pclive7.com):- ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’…२००९ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा खूपच गाजला होता. सचिन खेडेकर यांनी साकारलेली दिनकर भोसले या मुंबईतील मराठी माणसाची व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. तर सिध्दार्थ जाधवचा उस्मान पारकर लक्षवेधी ठरला होता.
(लेखन – बाळासाहेब जवळकर, जेष्ठ पत्रकार)

तब्बल १६ वर्षानंतर या बहुचर्चित सिनेमाची आठवण होणे अपरिहार्य आहे. कारण, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुरूवातीला सर्वांना वाटले की, हा आधीच्या सिनेमाचा दुसरा भाग आहे. परंतू तसे नाही. जुन्या आणि नव्या सिनेमाचा काहीही संबंध नाही. हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि त्यामुळे देशोधडीला लागणारी त्यांची कुटुंबे हा अतिशय गंभीर विषय केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हा सिनेमा काळ्या मातीतल्या वेदनांचा, अन्यायाचा आणि असहायतेचा आक्रोश मांडतो. समाजातील असंवेदनशीलतेवर आरसा धरून तो प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडतो. या सिनेमाच्या माध्यमातून शासकीय व्यवस्थेवर परखड भाष्य करत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहिला पाहिजे.

दुसरीकडे, या सिनेमात बऱ्याच उणीवा आहेत आणि त्या स्पष्टपणे दिसून येतात. सिनेमाची मूळ कथा चांगली आहे. मात्र पटकथा विस्कळीत आणि भरकटलेली वाटते. सिनेमाचा विषय मोठा आहे, गहन आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यादृष्टीने या विषयाचा सर्वार्थाने अभ्यास होणे गरजेचे होते, तो झाल्याचे दिसून येत नाही. चित्रपटाचा नेमका कालावधी कोणता आहे, हे स्पष्ट होत नाही.
‘मिस कास्टींग’ जाणवते. अनेक पात्रे अशी आहेत की त्यासाठी केलेली कलाकारांची निवड कोणता निकष लावून केली असेल, असा प्रश्न पडू शकतो. सिनेमात आमदार व मुख्यमंत्री यांचे महत्वपूर्ण पात्र आहे. ग्रामीण भागातील आमदाराचा तोरा कसा असतो, किंवा मुख्यमंत्र्यांचा दबदबा, थाट काय असतो. याची माहिती कदाचित नसावी. अन्यथा, त्यांच्या वाट्याला इतके फुटकळ प्रसंग आले नसते.

सुनील बर्वे कोणत्याही अँगलने मुख्यमंत्री वाटत नाही. सिनेमात मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे, हे शेवटपर्यंत समजून येत नाही. आडनावावरून जातीचा बोध होत असल्याने ते जाणीवपूर्वक टाळले असावे. सिनेमातील जागरूक पत्रकाराची व्यक्तीरेखा चुकीच्या पध्दतीने मांडण्यात आली आहे. त्यावर अधिक चांगल्या पध्दतीने काम होणे आवश्यक होते.
सयाजी शिंदे यांना वाया घालवले आहे. त्यांनी साकारलेला भ्रष्ट पोलीस अधिकारी कसाही वागतो, काहीही करतो. त्याला कोणतेही लॉजिक नाही. तसेही सिनेमात अनेक प्रसंगात लॉजिकला तिलांजली वाहण्यात आली आहे. सयाजीने सिनेमातील आमदार तथा मुख्यमंत्री अधिक चांगल्याप्रकारे साकारला असता, हे कोणीही नाकारू शकत नाही. तीच बाब सिध्दार्थ जाधवच्या बाबतीत आहे. सिध्दू नकारात्मक भूमिकेत अधिक उत्तम काम करतो. मात्र या सिनेमात त्याचा खलनायकी लूक हास्यास्पद किंबहुणा ओंगाळवाणा वाटतो.

सिध्दार्थ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षरश: जीवंत केली आहे. शेतकऱ्यांची सध्याची अवस्था पाहून महाराजांच्या संतापाचा उद्रेक कसा झाला असता, हे सिध्दार्थ बोडके यांनी प्रभावीपणे सादर केले आहे. त्यांच्या वाटेला आलेले प्रसंग, त्यांचा आवेश, कडक संवाद अंगावर शहारे आणतात. मात्र काही प्रसंगात त्यांच्या तोंडी प्रचारकी थाटातील विधाने टाकण्यात आली आहेत.
अनुभवी शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय कदम यांनी सफाईदारपणे आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
‘नाळ २’ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारे भार्गव जगताप आणि त्रिशा ठोसर यांची या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहे. दोघांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय देऊन त्यांची निवड सार्थकी ठरवली आहे.
हास्यजत्रेमुळे सर्वपरिचित झालेल्या पृथ्वीक प्रतापने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची वेदना मांडण्याचे काम उत्तमरित्या केलेले आहे. मात्र त्यांच्याकडे पाहून पिचलेला शेतकरी, असे काही वाटतच नाही, पृथ्वीकचा चेहरा रापलेला दिसत नाही. शेतकरी म्हणून त्याच्या वेदनाही कृत्रिम वाटतात. सावत्या उर्फ रोहित माने हा मुस्लीम रिक्षाचालकाच्या भूमिकेत आहे. वास्तविक त्याने अस्सल ग्रामीण शेतकरी अधिक चांगल्या पध्दतीने वठवला असता.

एवढ्या गंभीर विषयाच्या सिनेमातही ‘आयटम साँग’ घालण्याचा मोह आवरता आला नाही. (कथानकाची गरज आहे, असे सांगण्याची पुरेशी सोय करून ठेवलेली आहे). सिनेमात खटकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. बऱ्याच त्रुटी आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचे जगणं समजून घेण्यासाठी हा सिनेमा पाहिला पाहिजे.
शेतकऱ्यांची असहाय्यता, काळ्या मातीच्या वेदना त्यात मांडण्यात आल्या आहेत. समाजातील संवेदनाहीनतेवर आरसा दाखवण्यात आला आहे. अखेरीस राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून त्यावरील उपाययोजनाही सांगण्याचा प्रयत्न सिनेमाद्वारे करण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group