पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील चापेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येणा-या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील १५ वा अध्याय न अडखळता वाचून दाखविला. तसेच मुलांचे लाकडी कोरीव काम, धातू काम पाहून महाजन भारावून गेल्या. त्यांनी गुरुकुलमच्या कार्याचे कौतुक केले.
पिंपरी चिंचवड शहर दौ-यावर असताना महाजन यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट दिली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे, चापेकर समितीचे कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे आदी उपस्थित होते.
गुरुकुलममध्ये दिल्या जाणा-या शिक्षणाची माहिती प्रभुणे यांनी महाजन यांना दिली. महाजन यांनी संगणक, मूर्तीकाम, शिवण आदी विभागांना भेट देऊन शाळेची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित दिल्या जाणा-या प्रशिक्षण विभागाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे लाकडी कोरीव काम, धातू काम, लेत मशिनवरील काम, अगरबत्ती बनविण्याच्या कामाची महाजन यांनी पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील १५ वा अध्याय न अडखळता वाचून दाखविला. ज्ञानेश्वरीमधील अंभग, अग्निहोत्र मंत्र, कबिरांचे दोहे म्हणून दाखविले. विद्यार्थ्यांचे हे अचाट ज्ञान आणि कौशल्य पाहून महाजन भारावून गेल्या. विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
गुरुकुलममध्ये नव्या आणि जुन्या पारंपरिक शिक्षणाची सांगड घालून नवी पिढी तयार करण्याचे काम कौतुकास्पद आहे. गुरुकुलममध्ये सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार मुलांना शिक्षण दिले असून एक चांगली नवी पिढी तयार करण्याचे काम प्रभुणे उत्तमरीत्या करत असल्याचे सांगत लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी गुरुकुलमच्या कार्याचे कौतुक केले.






















Join Our Whatsapp Group