दोन्ही राष्ट्रवादी, युती आणि मविआचा फॉर्म्युला ‘असा’ असणार?
पिंपरी (Pclive7.com):- अखेर पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले, याची घोषणा पुतणे अजित पवारांनी केली. यानिमित्ताने परिवार एकत्र येत असल्याचं अजितदादांनी जाहीर केलं. पण या घोषणेचे पडसाद महायुती आणि महाविकास आघाडीत उमटणार हे उघड आहे. सर्वात मोठा धक्का हा मविआला बसला आहे. कारण शनिवार पर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी मविआचा भाग होती. रविवारी त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाणार होता, पण तितक्यात अजितदादांनी मविआला झटका दिला. त्यामुळं मविआचा प्लॅन ए फोल ठरला. आता मविआ प्लॅन बी अर्थात शरद पवार गट वगळून इतर घटक पक्षांची आघाडी करुन लढणार आहे. दुसरा झटका हा महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेनेला लागला आहे. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणा करत, आघाडी घेतल्यानं आता भाजप, शिंदे शिवसेना आणि आठवलेंची आरपीआय या युतीची आजचं घोषणा करण्याची तयारी सुरु आहे. हे पाहता पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदे सेना युती विरुद्ध मविआ अशी तिरंगी लढत होणार हे आता उघड आहे.

दोन्ही राष्ट्रवादी किती जागांवर आणि कसं लढेल?
128 पैकी अजित पवार गट 110 तर शरद पवार गट 18 असं जागावाटप ठरल्याचे बोललं जात आहे. फार तर फार शरद पवारांच्या वाट्याला आणखी 2-4 जागा येऊ शकतात. ज्या प्रभागात घड्याळ चिन्हाचे तीन आणि तुतारीचा एक उमेदवार असेल. तिथं चार ही उमेदवार घड्याळावर लढायचं. तसंच जिथं तीन तुतारीचे अन एक घड्याळाचा उमेदवार असेल, त्या प्रभागात चार ही उमेदवार तुतारी चिन्हावर लढतील. तर जिथं दोन घड्याळ आणि दोन तुतारीचे उमेदवार असतील, तिथं आपापल्या चिन्हावर लढायचं, अशी ही रणनीती आखली जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी मविआचा ठरलेला ‘प्लॅन ए’ कसा होता?
काँग्रेसला 30, ठाकरे सेनेला 35, मनसेला 18, इतर समविचारी 10 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 35 जागा देण्याचं प्लॅन ए मध्ये जवळपास ठरलं होतं. मात्र आता प्लॅन बी मध्ये शरद पवार गटाच्या वाट्यातील 35 जागांची विभागणी केली गेली आहे. त्यानुसार नेमक्या किती जागा कोणाच्या पारड्यात पडणार आहेत, हे दिवसभरात अंतिम केलं जाईल.

महायुतीचा फॉर्म्युला ठरेना..!
भाजप शिंदे शिवसेनेला 128 पैकी 14 जागा देण्याची तयारी करत आहे, तर आठवलेंच्या आरपीआयला 3 ते 5 जागा द्यायचं म्हणतंय. आरपीआयचे सर्व उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार हे अंतिम झालं आहे, आरपीआयची ही तशीच मागणी आहे. पण शिंदे शिवसेनेनं काही जागांसाठी ताणून धरलं आहे. त्यामुळं युती जाहीर झाली नाही. या युतीवर आज शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
























Join Our Whatsapp Group