पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ मधून सचिन मुरलीधर साठे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचे उमेदवारीचे पत्ते कापण्यात आल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारीचा पक्का शब्द देण्यात आला असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे साठे यांचे कार्यकर्ते, समर्थक तसेच प्रभागातील नागरिक व मतदारांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.

उमेदवारी देणाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सचिन साठे यांनी तयारी सुरू केली होती. मात्र नुकतेच त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने अनेक कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सचिन साठे यांनी काल आपल्या कार्यालयात कार्यकर्ते व समर्थकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना साठे म्हणाले, “आपल्या सर्वांशी चर्चा आणि विचारविनिमय करूनच येत्या दोन दिवसांत पुढील निर्णय घेणार आहे. मला उमेदवारीचा शब्द दिला असताना कोणत्या निकषांवर माझी उमेदवारी डावलण्यात आली, याचे कारण मी नक्कीच विचारणार आहे.”

सचिन साठे हे सन २००० पासून या भागातील राजकारणात सक्रिय असून त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. चिंचवडच्या राजकारणात त्यांचे नाव मानाने घेतले जाते. ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र अडचणीच्या काळात पक्ष सोडणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी ती ऑफर नाकारली होती. नंतरच्या काळात आमदारांचा मान राखत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता.
कार्यकर्त्यांना उद्देशून साठे म्हणाले, “आपण दिलेले प्रेम, विश्वास आणि साथ मी कधीच विसरू शकणार नाही. २००२ पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला मिळणाऱ्या मतांमध्ये कधीही घट झाली नाही, उलट सातत्याने वाढच झाली. दोन वेळा आपण उभे केलेले उमेदवार निवडून आले, तर काही वेळा अन्यायकारक पद्धतीने पराभवही पाहावा लागला. माझा परिवार फक्त साठे परिवार नसून जगताप, नांदगुडे, इंगवले, कांबळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांचा आहे.”

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका, जनता तुमच्यासोबत आहे,” अशा घोषणा देत आपला पाठिंबा व्यक्त केला.
या बैठकीस काळुशेठ नांदगुडे, भुलेश्वर नांदगुडे, श्रीकांत पाटील, राजाभाऊ मासूळकर, विजय जगताप, रवी शेठ काटे, भरत इंगवले, अरुणा ताई सूर्यवंशी, अनिल संचेती, माऊली बालवडकर, संजय दळवी, सुरेश साठे, अरुण नांदगुडे, रवी शेठ साठे, साहेबराव नांदगुडे, विजय पाटुकले, शेखर जगताप, रमेश नांदगुडे, नागेश जाधव, माऊली मुरकुटे यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group