पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक ६ मधील ‘ब’ जागेवरून भाजपचे उमेदवार रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २०१७ साली पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपचे खाते उघडण्याची कामगिरी रवी लांडगे यांनीच केली होती. यंदाही त्यांनी हीच परंपरा कायम ठेवत बिनविरोध निवड मिळवली आहे.

या प्रभागात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा ओबीसी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला गेल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यानंतर अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामध्ये रवी लांडगे यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे आणि प्रसाद ताठे यांचे अर्ज होते.

श्रद्धा लांडगे यांनी माघार घेण्याचा निर्णय आधीच स्पष्ट केला होता. मात्र प्रसाद ताठे यांच्या माघारीवर प्रश्नचिन्ह होते. अखेर रवी लांडगे यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर प्रसाद ताठे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. परिणामी रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले. या घडामोडीमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपला मोठे यश मिळाले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बिनविरोध निवड महत्त्वाची मानली जात आहे.

























Join Our Whatsapp Group