सीमा सावळे, संजय वाबळे यांची यशस्वी ‘लॉबिंग’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धक्कादायक निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णविराम लागण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. लांडे कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इंद्रायणीनगर–भोसरी प्रभाग क्रमांक ८ मध्येच त्यांच्या राजकारणाला निर्णायक धक्का बसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती व माजी नगरसेवक संजय वाबळे आणि भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी या प्रभागात अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी अशी ‘लॉबिंग’ केल्याची चर्चा आहे. लांडे यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळू नये, यासाठी अंतर्गत पातळीवर आखलेली रणनीती अखेर यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अनेकांना धक्कादायक मानला जात असून, त्यातून पक्षातील बदलती सत्तासमीकरणे आणि नव्या नेतृत्वाला मिळणारे प्राधान्य अधोरेखित होत आहे.
विशेष म्हणजे, भोसरी गावठाण या भागात उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लांडे यांचे पुतणे विराज लांडे यांना उमेदवारी दिली आहे. राजकीय अपरिहार्यता असली तरी ही सीट निवडून आणणे आव्हानात्मक आहे.

कधीकाळी भोसरी परिसरातील राजकारणावर वर्चस्व राखणारे विलास लांडे आज पक्षांतर्गत समीकरणांमुळे बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, लांडे कुटुंबियांचे राजकीय भवितव्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























Join Our Whatsapp Group