मिशन- PCMC : प्रभाग 28 मध्ये भाजपा परिवाराची एकजूट; विकासमाकांच्या मुद्यावर शत्रुघ्न काटे यांना विजयाचा विश्वास
पिंपरी (Pclive7.cim):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक शिस्तीचे ठळक उदाहरण समोर आले आहे. भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस तसेच वाणी समाजाचे सक्रीय कार्यकर्ते मनोज चिंतामन ब्राह्मणकर यांनी ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला आणि पक्षाच्या अधिकृत पॅनेलला साथ देण्याची भूमिका घेतली आहे.

राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्षाचा अधिकृत निर्णय मान्य करण्याचा ब्राह्मणकर यांच्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांमध्ये स्वागत होत आहे. “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या भाजपाच्या विचारधारेचे त्यांनी कृतीतून दर्शन घडविले आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर ब्राह्मणकर यांनी प्रभाग क्रमांक २८ मधील भाजपाच्या अधिकृत पॅनेलच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या सामाजिक संपर्काचा आणि संघटनात्मक अनुभवाचा लाभ पॅनेलमधील उमेदवारांना होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

प्रभाग क्रमांक २८ मध्ये शत्रुघ्न काटे, अनिता काटे, कुंदा भिसे आणि संदेश काटे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असून, इच्छुक उमेदवारांच्या या पाठिंब्यामुळे निवडणूक रणधुमाळीत भाजपाची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. पक्षशिस्त, संघटनात्मक ताकद आणि विकासाचा ठोस अजेंडा याच जोरावर मिशन PCMC यशस्वी करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे.
“प्रभाग क्रमांक २८ मधील कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि विविध समाजघटकांनी दाखविलेली पक्षनिष्ठा ही भाजपाची खरी ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन, कोणताही भेदभाव न करता नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे राबविणे हा माझा स्पष्ट निर्धार आहे. संघटनाची एकजूट आणि विकासाचा ठोस अजेंडा याच्या बळावर प्रभागाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साधू.”– शत्रुघ्न काटे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 28, रहाटणी-पिंपळे सौदागर.
























Join Our Whatsapp Group