पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवारी पिंपरी चिंचवड दौरा उरकताच महापालिकेच्या राजकीय हालचालींना वेग आला. आज (मंगळवारी) महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी राजीनामे दिले. उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे तर नितीन काळजे यांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला.
महापौर आणि उपमहापौरांना पक्षाने सव्वा वर्षांची मुदत संपल्यामुळे राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार काळजे आणि मोरे दोघांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापालिकेत आता नवा गडी नवे राज्य येणार आहे. प्रशासनाने नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन आठवड्यात शहराला नवीन महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी- चिंचवडमध्ये सत्तांतर घडले. राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येऊन भाजपने प्रथमच महापालिका काबिज केली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक राजकीय वजनदार नेते अजितदादा पवार यांना धूळ चारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना सोबत घेऊन महापालिका ताब्यात घेतली. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेतेसह सर्वच महत्त्वाच्या पदांवर भाजपच्याच नगरसेवकांची वर्णी लागली.
महापौरपद ओबीसीसाठी राखीव होते. त्यानुसार या पदावर भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक नितीन काळजे यांची वर्णी लावण्यात आली. उपमहापौरपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शैलजा मोरे यांना संधी मिळाली. तसेच सत्तारूढ पक्षनेतेपद भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच एकनाथ पवार यांना देण्यात आले. ही पदे देताना प्रत्येकाला सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत जून रोजी संपल्यामुळे महापौर, उपमहापौर बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, विधानसभा अधिवेशन आणि अन्य राजकीय व्यस्ततेमुळे महापालिकेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि.२३) पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते चिंचवडगावातील क्रांतीकारक चापेकर स्मारक समितीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत राजकीय गुफ्तगू केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील पदाधिकारी बदलाला ग्रीन सिग्नल दिला. पक्षाने महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतर महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. काळजे म्हणाले की, प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आली आणि मला महापौर होण्याचा पहिलाच मान मिळाला. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. महापौरपदाच्या कार्यकालात त्यात अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक कामे पूर्ण झाली, याचा मला अभिमान वाटतो. पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात अपयश आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या की, राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना थेट राजकारणात आले आणि गृहिणी ते उपहापौर बनले. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी सहकार्य केल्यामुळे उपमहापौरपदाची कारकीर्द यशस्वीपणे पार पडली. यापुढे वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर आपला भर राहील.






















Join Our Whatsapp Group