पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या बहुचर्चित बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये आज (बुधवारी) बसची चाचणी घेतली जाणार आहे. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चाचणी होणार आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान ही चाचणी घेतली जाणार आहे. यावेळी याचिकाकर्ता, पीएमपीएमएल व पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय बनलेल्या निगडी-दापोडी बीआरटीएस मार्ग अद्यापही सुरू झालेला नाही; मात्र हा बीआरटीएस मार्ग खुला होण्यास सज्ज असून, प्रत्यक्ष बस धावण्यास उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निगडी -दापोडी बीआरटीएसच्या दोन्ही मार्गिकांवरील ९५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या मागणीवरून ही चाचणी होणार आहे.
यापूर्वी शहरातील सांगवी ते किवळे आणि वाकड ते नाशिकफाट्या दरम्यानचा बीआरटीएस मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला; परंतु या दोन्ही मार्गांपेक्षा दापोडी ते निगडीदरम्यानचा रस्ता हा महामार्गावरील आहे. पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान ग्रेडसेपरेटर असून, इन आणि आऊट असल्याने वाहतुकीसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. या संदर्भात आयआयटी पवई या संस्थेकडून वाहतूक सुरक्षितता तपासणी करून घेण्यात येत आहे. संस्थेने केलेल्या सूचनेनुसार काही फेरबदल करण्यात येत असून, त्यानुसार बीआरटीएस मार्गावर ही चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आयआयटी पवईचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून, त्यावर न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार की नाही हे ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group