पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला (भाजप) बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत संघटनेचे शहर व जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब खंदारे यांनी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा. शत्रुघ्न (बापू) काटे यांना अधिकृत पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. यावेळी संघटनेचे बालाजी कांबळे, गिरीश सोनवणे, भिमराव बरगडे उपस्थित होते.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यात आणि केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, विकासकामे व सामाजिक न्यायाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे कौतुकास्पद असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

मातंग समाजाच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपभाऊ कांबळे, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत मातंग समाज मोठ्या संख्येने भाजपच्या पाठीशी उभा राहून मतदान करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
























Join Our Whatsapp Group