पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले असून लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. मतदान केंद्रांवर सुरळीत व्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. आजच्या मतदानातून शहराच्या विकासाचा पुढील मार्ग ठरणार असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे.

महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ स्त्रिया आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १६ हा ७५ हजार १०५ मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे, तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३३ हजार ३३ मतदार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी एकूण २ हजार ६७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
यामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ५२, कार्यालय क्रमांक २ अंतर्गत ५४, कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत ३, कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत सर्वाधिक १०८, कार्यालय क्रमांक ५ अंतर्गत २७, कार्यालय क्रमांक ६ अंतर्गत २२, कार्यालय क्रमांक ७ अंतर्गत २३ तसेच कार्यालय क्रमांक ८ अंतर्गत ३३ तात्पुरती मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. अशा प्रकारे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३२२ तात्पुरत्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
























Join Our Whatsapp Group