निगडी (Pclive7.com):- महाशिवरात्रीनिमित्त श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी गंगा आरती आणि गंगाकलश स्नान शिवभक्तांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती अण्णा बनसोडे, नगरसेविका शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित हिमांशू पांडे आणि गगन भार्गव यांच्या पौरोहित्यानुसार सायंकाळी ७.१५ वाजता गंगा आरती तर रात्री ८.०० वाजता गंगाकलश स्नान विधी पार पडला. शंखनाद व घंटानादाच्या मंगल ध्वनीत श्रीगणेश पूजन, शिवस्तुती, शिवस्तवन तसेच धूप, दीप व कर्पूर आरतीने श्री केदारेश्वराची महाआरती करण्यात आली. उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी करत हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमून सोडला.

महाशिवरात्री २०२६ महोत्सवानिमित्त रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० वाजता रुद्राभिषेक, सकाळी ७.३० वाजता बागलकोट कृष्णशिला इच्छाधारी नागधाम प्राणप्रतिष्ठापना व श्रीफळ जलअभिषेक, सकाळी ८.०० वाजता आरती संपन्न झाली. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत रक्तदान शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

दुपारी १२.०० वाजता पवनसुत भजनी मंडळाचे भक्तीभजन, दुपारी ३.०० वाजता स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळाचे स्वरभजन सादर झाले. दुपारी ४.३० वाजता शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणांतर्गत लाठीकाठी व दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता कलारंजनी संगीत विद्यालयाच्या वतीने ‘सत्यम् शिवम् सुंदरा’ हा भावगीतांचा कार्यक्रम सादर झाला. रात्री ८.१५ वाजता स्थानिक कलाकारांनी भक्ती संगीतमालेतून वातावरण अधिक भक्तिमय केले. रात्री ११.०० वाजल्यापासून पहाटे ५.०० वाजेपर्यंत महाशिवरात्र जागरण करण्यात आले. चार प्रहर पूजेनंतर महोत्सवाचा समारोप झाला. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर बाळा शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





















Join Our Whatsapp Group