पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राच्या प्रशासन, कृषी, पर्यावरण व संसदीय कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार अमित गोरखे यांच्यासह महाराष्ट्रातील १५ आमदारांनी १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत लंडन व वेल्स येथे पाच दिवसीय अधिकृत अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड’ यांच्या वतीने आयोजित या अभ्यासक्रमात जागतिक नेतृत्व, पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती, शाश्वत कृषी व्यवस्थापन व संसदीय लोकशाही प्रणालीचा सखोल अभ्यास करण्यात आला.

प्रशासकीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्व दौऱ्याबाबत माहिती देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, शासन व्यवस्थेत केवळ धोरणे जाहीर करणे पुरेसे नाही, तर त्या धोरणांचे प्रत्यक्ष परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. इम्पॅक्ट असेसमेंट, डिजिटल मॉनिटरिंग व उत्तरदायित्व हीच आधुनिक प्रशासनाची खरी ओळख आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक शहरात डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि कार्यक्षम अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक योजनेचा खर्च-लाभ विश्लेषण (कॉस्ट-बेनिफिट अनालिसिस) व परिणाममापन प्रणाली विकसित केल्याशिवाय प्रशासन प्रभावी ठरणार नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘कार्यक्षमता डॅशबोर्ड’, विभागनिहाय मुख्य कार्यक्षमता निर्देशांक (KPIs) आणि नागरिकांना खुली माहिती प्रणाली विकसित करण्याचा माझा प्रयत्न राहील.
वेल्स देश कचरा व्यवस्थापनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर भाष्य करताना आमदार गोरखे म्हणाले, तिथली अत्याधुनिक पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) पद्धत आणि कचऱ्याचे संसाधनात रूपांतर करण्याची कला आदर्श आहे. तसेच, पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तिथे राबवली जाणारी ‘चक्रीय जल अर्थव्यवस्था’ (सर्क्युलर वॉटर इकॉनॉमी) थक्क करणारी आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आपण पिंपरी-चिंचवडमध्ये राबवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार आहोत.
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात आमदार अमित गोरखे उत्साहाने सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘रयतेचे राज्य’ हे सुशासन आणि पारदर्शकतेचे जागतिक स्तरावरील सर्वात आदर्श उदाहरण आहे. तीच शिवकालीन सुशासनाची मूल्ये आधुनिक प्रशासनात आणि लोकशाहीत राबवण्याचा संकल्प या निमित्ताने केला आहे. अतिशय गौरवपूर्ण आणि उत्साही वातावरणात सातासमुद्रापार ही शिवजयंती साजरी करण्यात आली.

हवामान बदल ही गंभीर समस्या असल्याचे सांगत आमदार अमित गोरखे यांनी ‘क्लायमेट-रेझिलियंट’ पिके आणि अचूक शेती यावर भर दिला. ‘सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी’ येथील भेटीनंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सौरऊर्जा प्रकल्प, ई-वाहन चार्जिंग नेटवर्क आणि शून्य-कार्बन (झिरो-कार्बन) तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. पाच दिवसांचा सखोल आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, सर्व सहभागी सदस्यांसाठी विशेष प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन’ (CPA) चे उपसचिव जार्विस मतिया यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अमित गोरखे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘कॉमनवेल्थ लीडरशिप इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष डॉ. जोनाथन ग्रे, ‘UWTSD’चे इयान बॅसेट आणि डीन प्रो. जेरेमी स्मिथ यांसारख्या आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती होती.




















Join Our Whatsapp Group