पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढू लागला आहे. वातावरणामध्ये अचानक झालेला बदल लक्षात घेता शहरामध्ये स्वाईन फ्लू आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना करतांना दिसून येत नाही. वायसीएम रूग्णालयात स्वाईन फ्लूच्या रूग्णांकरिता स्वतंत्र कक्ष देखील नाही. तातडीने स्वतंत्र कक्ष स्थापन करून स्वाईन फ्लूला आळा घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
वायसीएम रूग्णालयाचे मुख्य अधिक्षक डॉ. पवन साळवे यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पिंपरी विधानसभा शिवसेना शहर संघटक जितेंद्र ननावरे, नगरसेनक निलेश बारणे, समन्वयक माजी नगरसेवक किरण मोटे, विभाग प्रमुख राजेश वाबळे, रवींद्र ओव्हाळ, शरण शिंगे, मनोज मातंग, राहुल कांबळे, गणेश झाडे इत्यादी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट आवळला जात असून गेल्या पंधरा दिवसात आठ रुग्ण बळी गेल्याने शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारावर अनेक पॉझिटिव्ह रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत असून स्थानिक प्रशासन स्वाईन फ्लू संदर्भात अटकाव करण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाकडून या आजाराबाबत काटेकोर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही यामुळे शहरामध्ये स्वाईन फ्लू पुन्हा डोके वर काढत आहे.
शहरात मागील वर्षी ६१ रुग्ण दगावले होते. जानेवारी २०१८ ते जुलै अखेरपर्यंत फक्त एक रुग्ण दगावला होता परंतु ऑगस्ट महिन्याच्या पंधरा दिवसाच्या कालखंडात तब्बल आठ रुग्ण दगावल्याने परिस्थिती हालाखीची होत चालली आहे. याबाबतीत प्रशासनाने काळजीपूर्वक गंभीर विचार करून होर्डिंग, परिपत्रक, जनहितार्थ प्रबोधन, शालेय स्तरावर जनजागृती करणे व शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने टेमी फ्लू च्या गोळ्यांचा योग्य मुबलक साठा करून ठेवणे गरजेचे आहे. या ऑगस्ट महिन्यात केवळ १५ दिवसात आठ रुग्णांचा बळी गेल्याने प्रशासन अजूनही कोणतीही ठोस उपाय योजना करीत नाही. या आजाराने शहरामध्ये अजून किती रुग्णांचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ?
त्यानुसार विचार करून वाय.सी.एम रुग्णालयामध्ये या आजाराबाबत विशेष कक्ष तातडीने सुरु करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित आहे. यासाठी आपल्या संबंधित विभागाकडून लवकरात लवकर कार्यवाही सुरु करून स्वाईन फ्लूवर आळा घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group