पुणे (Pclive7.com):- आपल्या घरात असलेल्या पाळीव प्राण्यांबाबत ममत्व असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. घरात असलेल्या पाळीव प्राण्याच्या लाडकोड ही केले जातात. मात्र, आपण सहसा कुत्रा-मांजर किंवा गाय-बैल यांच्या बाबत हे ऐकत असतो. पण, कोंबड्याचा वाढदिवस ऐकला आहे का? पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये आपल्या पाळीव कोंबड्याचा चक्क वाढदिवसच साजरा करण्यात आला.
बहारदार कोंबडा बघितला की मांसाहारी शौकिनाच्या तोंडला पाणी सुटते, कोंबडा हा विषय खाण्यापर्यंतच मर्यादित असल्याचा समज अशा खवय्यांचा असतो. मात्र, कोंबड्याला जीव लावला तर तो इतर कुत्रा मांजर या पाळीव प्राण्यांसारखाच घरातला एक सदस्य बनून जातो. याचे उदाहरण राजगुरूनगर इथे राहणाऱ्या सोनवणे कुटुंबियाकडे पाहायला मिळते आहे. राजगुरूनगरमध्ये नोकरीनिमित्ताने स्थायिक झालेले रामचंद्र सोनवणे पत्नी आणि मुलासह राहतात, त्यांचा मुलगा ऋतुराज याला गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला रस्त्यावर एका कोंबडीचे पिल्लू सापडले. एकटेच फिरत असलेल्या या कोंबडीच्या पिल्लाला पाहून ऋतुराजला त्याला घरी घेऊन जाण्याचा मोह झाला. तो ते पिल्लू घेऊन घरी आला. आपल्या आई-वडिलांना पिल्लू घरात ठेवण्याचा आग्रह त्याने केला. सर्वांनीच मग पिल्लू घरात ठेवण्याचा निर्णय घेतला. हळूहळू घरातल्या लहान मुलाप्रमाणे सर्वाना त्याचा लळा लागला.
कोंबडीच पिल्लू ही सोनवणे कुटुंबियात चांगलेच रमले आणि मग सर्वांचीच चांगली गट्टी जमली. त्याला सोनवणे कुटुंबियांचे बोलणे ही कळायला लागले. खाऊन घे, पाणी पी, झोपायला ये, असे सगळे त्याला कळू लागले. त्याचे नामकरण करण्यात आले आहे. पिल्लू या नावानेच त्याला हाक मारली जाते. गेली १ वर्ष या प्रेमात वाढणाऱ्या पिल्लाचे हळूहळू रुबाबदार तुरेवाल्या कोबड्यात रूपांतर झाले. १ वर्षापूर्वी गणरायाच्या आगमनाच्या दिवशी हे कोंबडीचे पिल्लू सापडले असल्याने या गणेश चतुर्थीला एक वर्ष पूर्ण झाले. कोंबड्याचा पहिला वाढदिवस केक कापून सोनवणे कुटुबियांनी साजरा केला. प्रेम आणि आपुलकीत या पिल्लाचा कोंबडा कधी झाला आणि त्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. सोनवणे कुटुंबीयांसह हा त्यांच्या घरातील एक सदस्यच बनला आहे.






















Join Our Whatsapp Group