पिंपरी (Pclive7.com):- फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर करत ५ दिवसांच्या बाप्पांसोबत गौराईंचे सोमवारी (दि. १७) विसर्जन करण्यात आले. निरोप देतानाच गणपती बाप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या! असे साकडेही घातले. गणेश मूर्ती दान उपक्रमाला शहरवासियांनी यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने सायंकाळी चारनंतर गणेश विसर्जनाने वेग घेतला. सोसायट्यांनी एकत्रितपणे छोटेखानी विसर्जन मिरवणुका काढल्या. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असे म्हणत टाळ, मृदंग आणि ढोल-ताशांच्या तालावर अबाल-वृद्धही मिरवणुकीत उत्साहात सहभागी झाले होते. ट्रकमधून, गाडीतून, दुचाकीवरून छोटेखानी मिरवणुका निघत होत्या. गणपती बाप्पा, गौराईंसोबत सेल्फीत काढून घेताना गणेशभक्त दिसत होते. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी होती. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, विसर्जन घाटांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वाहतूक पोलीस, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज होते.
काही गणेशभक्तांनी टाळ मृदुंगाच्या साथीने भजन करीत मिरवणूक काढली. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. महिलाही मोठ्या संख्येने या मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. पाच दिवस अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्री गणेशाने परतीची वाट धरली. शेवटची मंगल आरती आटोपून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असे आग्रहाचे निमंत्रण देऊन साश्रु नयनांनी बाप्पांना निरोप देण्यात आला. बाप्पांना निरोप देताना भक्तांना गहीवरून आले होते.






















Join Our Whatsapp Group