पिंपरी (Pclive7.com):- स्वत:ला शासकीय अधिकारी असल्याचे भासवून लोकांना दमदाटी करून खासदार निधीची व शासकीय कामांची चौकशी करणाऱ्या ‘तोतया’ विरोधात शिरूरचे लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. श्रीराम अशोकसिंग परदेशी असे या तोतयाचे नाव असून स्वत:ला तो शासकीय अधिकारी असल्याचे सांगत असल्याचे आढळराव यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, श्रीराम अशोकसिंह परदेशी नामक व्यक्तीने स्वत:ला चेकींग ऑफीसर असल्याचे सांगून मंत्रालयातून खासदार निधीतील कामाची चौकशी करण्यासाठी आल्याचे सांगून फसवणूक केल्याची तक्रार शिक्षण प्रसारक मंडळ, पाबळ या शैक्षणिक संस्थेने माझ्याकडे केली आहे. या व्यक्तीच्यासोबत आणखी दोन जण असतात. त्यांच्याकडे दुचाकी पँशन प्रो हे वाहन असून त्याचा नंबर MH 14 CR 5188 असा आहे. या आरटीओकडून माहिती घेतली असता, श्रीराम अशोकसिंह परदेशी, राहणार अजमेरा हौसिंग सोसायटी, ओ/बी/४, ८००१, पिंपरी १८ या व्यक्तीच्या नावावर हे वाहन आहे. हा तोतया शासकीय अधिकारी बनून लोकांना दमदाटी व उद्धट भाषेत वर्तन करून शासकीय कामांची माहिती घेत असून या माध्यमातून खंडणी मागण्याची तसेच लोकांची आर्थिक लुबाडणूक करण्याची दाट शक्यता आहे. तरी त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी खासदार आढळराव पाटील यांनी पोलीसांकडे केली आहे.
याप्रकरणी खासदार आढळराव यांनी सोशलमिडीयावर देखील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. या तोतया अधिकाऱ्यापासून सावध राहण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. श्रीराम अशोकसिंह परदेशी हा तोतया शासकीय अधिकारी बनून लोकांना दमदाटी व उद्धट भाषेत वर्तन करून शासकीय कामांची माहिती घेत असून या माध्यमातून खंडणी मागण्याची तसेच लोकांची आर्थिक लुबाडणूक करण्याची दाट शक्यता आहे. खासदार निधी व अन्य शासकीय निधीच्या कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ अथवा मंत्रालयातून कोणाही व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे चौकशी केली असता माझा खासदार निधी व मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या खासदार निधीची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती घेऊन सदर इसम सगळीकडे स्वतःला शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फिरतो आहे. केवळ आमच्या दोघांच्याच निधीतील कामांवर याची नजर असून हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समजते. मी हा सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर घातला असून लवकरच संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल. नागरिकांनी सावधगिरी बाळगून अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये. तसेच असे तोतयागिरीचे प्रकार आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे आवाहन खासदार आढळराव यांवी सोशलमिडीयाच्या माध्यमातून केले आहे.