पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरीत कँडल मार्च
पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी, कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना लवकरात लवकर अर्थिक मदत देण्यात यावी यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.
हिंजवडी, कासारसाई येथील दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती पिंपरी चिंचवड शाखा तसेच जय भगवान महासंघच्यावतीने पिंपरीत कँडल मार्च व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची मागणी केली.
गुरुवारी सायंकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून गोकूळ हॉटेल, शगुन चौक, कराची चौक, रिव्हर रोड, झुलेलाल मंदिर येथील पवना घाट येथे कँडल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी घाटावर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीस श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रध्दांजली सभेला जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, नगरसेविका योगिता नागरगोजे, केशव घोळवे, गणेश ढाकणे तसेच पिंपरी चिंचवड मधील विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता.
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी साखर कारखाना परिसरात कायमस्वरूपी साखर शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ जाहिर करावे. या महामंडळांतर्गत मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.






















Join Our Whatsapp Group