पिंपरी (Pclive7.com):- पवार कुटुंबाची तिसरी पिढी आता निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत स्पष्टपणे बोलणं टाळलं आहे. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. पार्थच्या राजकारण प्रवेशावर एका वृत्त वाहिनीने विचारलं असता अजित पवारांनी कोणतंही थेट उत्तर दिलं नाही. आपल्याला माहित नाही, असं उत्तर त्यांनी अगोदर दिलं. पण लोकशाही आहे, लोक काय म्हणतात ते पाहू, असं ते नंतर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आहे. या बैठकीत स्थानिकांचं आणि प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ऐकून घेणार आहेत. त्यानंतर निर्णय होईल, असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार उतरण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. श्रीरंग बारणे हे मावळचे खासदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघ आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारणेंना ५ लाख १२ हजार २२३ मतं मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर तिसऱ्या स्थानावर होते. नार्वेकरांना १ लाख ८२ हजार २९३ मतं मिळाली होती.
मागील जिल्हापरिषद निवडणुकीपासून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. रोहित पवार यांच्या जोडीला पार्थ पवार यांना राजकारणात आणून राष्ट्रवादी राज्यातील तरुणांचे मोठी संघटना निर्माण करण्याची करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पार्थ पवार यांनी यापूर्वीही आजोबांसोबत (शरद पवार) विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. शिवाय ते नागपुरात विधीमंडळाचं कामकाज पाहण्यासाठीही हजेरी लावली होती.





















Join Our Whatsapp Group