पिंपरी (Pclive7.com):- मागील चार वर्षात राज्यात महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि एकूणच गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. शहरातील गुन्हेगारांवर अद्यापही जरब बसलेली नाही. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड व पुणे परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि खुनाच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. अगदी शुल्लक घटनांवर पोपटासारखे बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत मुग गिळून का गप्प आहेत असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे. या घटनांची नैतिक जबाबदारी स्विकारुन राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी साठे यांनी केली आहे.
शहरातील विकास कामांची उद्घाटने करुन श्रेय लाटण्यासाठी वेळोवेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट शहरात येतात. परंतू कासारसाई (हिंजवडी), पिंपरी आणि चिंचवड येथील पिडीत कुटूंबियांना भेटण्यास पालकमंत्र्यांना देखील वेळ नाही हे लांच्छनास्पद असल्याची टिका साठे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसने वेळोवेळी पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. १५ ऑगस्ट रोजी पुरेसे मनुष्यबळ नसतानाही बापट यांच्या उपस्थितीत आयुक्तालय सुरु केले. तरी देखील शहरातील गुन्हेगारी, खून, बलात्कार, बेकायदेशीर धंदे, पार्किंग मधील वाहने तोडफोड व जाळण्याच्या घटना, सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड, सोनसाखळी चोरी व मोबाईल चोरीच्या घटनांवर अद्यापही पोलिसांना नियंत्रण मिळविता आले नाही. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु करण्याचा हेतू साध्य झाला नसल्याचे यातून दिसते. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group