पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारांकडून कोणतीही भेटवस्तू, देणग्या स्वीकारु नयेत. तसेच आपल्या कुटुंबीयांनाही भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये, असे आढळल्यास शिस्तभंगाईची कारवाई केली जाईल, असे परिपत्रक मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम १९७९ मधील कलम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही भेटवस्तू स्वत: स्वीकारता कामा नये. तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये.
कर्मचाऱ्याने त्यांच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून, औद्योगिक, वाणिज्यिक संस्थांकडून, संघटनांकडून किंवा तत्सम मंडळाकडून केलेला पाहुणचार स्वीकारण्याचे टाळावे, असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकांनी अशा भेटवस्तू घेऊन येणाऱ्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव करावा. अधिकारी, कर्मचा-याने भेटवस्तू स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाईची कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.