पिंपरी (Pclive7.com):- भाजपच्यावतीने प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानात ३ नोव्हेंबर रोजी अटल संकल्प महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र शहरातील क्रिडा मैदानांवर राजकीय पक्षाचा कार्यक्रम घेण्यास निर्बंध घालण्याचा ठराव महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केला असल्याचे सांगत भाजपाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी थेट ‘आपलं सरकार’च्या वेब पोर्टलवर या जागेवर मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊ नये अशी तक्रार केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीनेही या संधीचा फायदा घेतला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी धिंग्रा मैदानावर सभेस परवानगी देऊ नये अशा मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या या सभेच्या जागेवरून चांगलाच ‘वादंग’ निर्माण झाला आहे.
भाजपाचे कार्यकर्ते सचिन काळभोर म्हणाले की, मदनलाल धिंग्रा क्रिडा मैदानावर अनेक खेळाडू क्रिडा प्रकाराच्या कसरती करत असतात. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या देखील लागणार आहेत. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना खेळायला मैदान खुले असणे आवश्यक बाब आहे. मात्र, भाजपच्या पदाधिका-यांनी या मैदानावर मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. वास्तविक या मैदानावर लाखो लोक आल्यास पार्कींगचा प्रश्न उद्भवणार आहे. लोकांना ही जागा बसायला पुरणार नाही. त्यातच पालिकेत भाजपच्याच पदाधिका-यांनी यासंदर्भात केलेल्या ठरावानुसार पक्षाच्या सभा अथवा मेळावा या मैदानावर घेता येत नाहीत. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊ नये, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना मदनलाल धिंग्रा मैदानासाठी करोडो रुपये खर्च करुन शहरातील खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. महागडी हिरवळ, मैदानाचे सपाटीकरण, अत्याधुनिक दिवे, मैदानासाठी स्प्रिंक्लर सिस्टिम इत्यादी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या मैदानावर सभा घेण्यात आली तर महापालिकेने आतापर्यंत या मैदानावर खर्च केलेले करोडो रुपये वाया जाणार आहे. मैदानावरील पुरविण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा खराब होण्याची शक्यता आहे. तसेच मैदान व मैदानावरील हिरवळही खराब होऊन खेळांडूंना हे मैदान वापरता येणार नाही. तरीही भाजपच्या पदाधिका-यांनी या मैदानावर मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. वास्तविक या मैदानावर लाखो लोक आल्यास पार्कींगचा प्रश्न उद्भवणार आहे. लोकांना ही जागा बसायला पुरणार नाही. यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या मैदानावर सभेस परवानगी देऊ नये अशी मागणी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, मुळातच सचिन काळभोर हा भाजपाचा कार्यकर्ता नाही. त्याचा भाजपाशी काहीही एक संबंध नाही. मदनलाल धिंग्रा मैदानावर महापालिकेची अधिकृत परवानगी घेऊनच भाजपाचा अटल संकल्प महासंमेलन होणार आहे. त्यासाठी रितसर परवानगी घेऊन मैदानाचे पैसे देखील आम्ही जमा केले आहेत. मैदानात राजकीय पक्षाचे कोणतेही कार्यक्रम घेऊ नये असा कोणताही ठराव झालेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला कोणतीही अडचण नसून ठरल्या प्रमाणे महासंमेलन त्याच मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी १५ वेगवेगळ्या ठिकाणी पार्कींगची व्यवस्था देखील आम्ही केली आहे.
याप्रकरणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचे संमेलन होणार आहे. तशी या कार्यक्रमासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रितसर महापालिकेकडून परवानगी घेतली आहे. परंतू या कार्यक्रमासंदर्भात एक तक्रार आलेली असून त्याबाबत पडताळणी करून उचित निर्णय घेण्यात येईल.
ठरल्याप्रमाणे भाजपाचे होणारे हे महासंमेलन याच जागेवर पार पडेलही. परंतू या सुरू झालेल्या या वादंगामुळे कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट आहे. आता महापालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.