पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी, मारूंजी येथून पीजी रूमच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून आतमध्ये झोपलेल्या तरुणीच्या हातातील सोन्याची अंगठी व मोबाईल हिसकावून नेले होते. ही जबरीचोरी करणाऱ्या चोरट्याला तब्बल ७२ सीसीटीव्हींचा तपास करून अटक करण्यात हिंजवडी पोलीसांच्या तपास पथकाला यश आले आहे. ओंकार शिवाजी खरात (वय २१, रा. बोडके वाडी, माण हिंजवडी पुणे व मुळ गाव सातारा) यास पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी मेघना रामचंद्र सावंत (वय २३, रा. एसएस पीजी, लक्ष्मी चौक, मारुजी, पुणे) या त्यांच्या पीजी रूममध्ये आतील कडी लाऊन झोपल्या होत्या. पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने त्यांच्या रूमच्या दरवाजाच्या बाजुला असलेल्या खिडकीतून हात घालुन दरवाजाची आतुन लावलेली कड़ी उघडुन आत प्रवेश केला. त्यानंतर या तरूणीच्या हातातील सोन्याची अंगठी व दोन मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकाऊन चोरून नेले होते.
त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तात्काळ तपास चालू करण्यात आला. तपासादरम्यान घटनास्थळावर मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेज तसेच आजुबाजुचे उपलब्ध एकूण ७२ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा येण्याजाण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला. त्यावेळी एक संशयित इसम हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीतून घटनास्थळी आला व गेल्याचे निष्पन्न झाले. रात्रीचा अंधार व पाऊस यामुळे वाहनाचा नंबर दिसत नव्हता. केवळ ते वाहन ज्या ठिकाणाहून आले व परत तेथेच गेले त्या ठिकाणी सुमारे ३५० रूम भाडे तत्वावर असून, त्यातील राहणारे काही इसम हे त्यांचेकडील वाहन हे ओला उबरसाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्या सर्वांकडे कसोशीने तपास करता, त्यामधील एका इसमाने संशयित इसमाच्या प्राप्त फुटेजवरून त्यास ओळखले. त्याच्याकडून प्राप्त झालेल्या मोबाईल नंबरवरून संशयिताचे सीडीआरचे तांत्रीक विश्लेषण करून संशयित इसम हा सातारा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून तात्काळ दोन तपास पथके तयार करून त्यांना सातारा येथे पाठविण्यात आले.
तपास पथके सातारा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी आरोपी ओंकार शिवाजी खरात, याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. आरोपीवर सातारा आणि विटा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी त्याच्याकडून हिंजवडी येथून तरूणीची जबरदस्तीने चोरलेली सोन्याची अंगठी, दोन मोबाईल फोन असा ५० हजार किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला. या चोरीत आरोपीने वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार ही हिंजवडी पोलीसांनी जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परि २ आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, संदिप देशमुख, पोलीस उप निरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार बंदु मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, संजीव सावंत, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव, सागर पंडीत यांनी केली आहे.