पिंपरी (Pclive7.com):- पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत असत. अशातच मित्र-मंडळींमध्येही पत्नीने बदनामी केली म्हणून पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.
जय देवीदास तेलवाणी (वय २५, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी कांचन देवीदास तेलवाणी (वय ४०, रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जयची पत्नी तृप्ती जय तेलवाणी (वय २१) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मार्च २०१८ ते १३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फिर्यादी यांची सून तृप्ती ही जयसोबत सतत घरगुती कारणांवरून वाद घालत असे. वारंवार पैशांची मागणी करून त्याचा छळ करत होती. पैसे न दिल्यास त्याला शिवीगाळ आणि मारहाणही करत होती. त्याच्या मित्रमंडळीमध्ये तिने जयला कॅन्सर झाला आहे, असा टिकटॉक व्हिडिओ बनवून पाठवला होता. या सर्व प्रकाराला कंटाळून जयने अखेर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group