पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान पद हे देशातील सर्वोच्च आदरयुक्त पद आहे. त्या पदावरील व्यक्तीला मारण्याची भाषा करणे ही देश विघातक कृती आहे. ही कृती देशातील निजाम आणि रझाकारांची पिलावळं आपल्या राजकीय स्वार्थासाठी करत असून त्यांची निजामशाही चालू देणार नाही, अशा जहाल शब्दात राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी ओवेसी बंधूंवर पलटवार केला आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील चारमिनार विधानसभा मतदारसंघातील रॅलीला संबोधित करताना एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून ‘चहा वाल्या, आम्हाला उकसवू नको, चहा चहा ओरडता, लक्षात ठेवा, एवढंच बोलेन की, एवढं मारेन की कानातून रक्त येईल; असे वादग्रस्त विधान केले.
ओवेसी यांच्या विधानानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनीही ओवेसी यांच्या व्यक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त करून अत्यंत कडक शब्दांत निषेध केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतातील मुसलमान बांधवांमध्ये इतर समाजाविषयी द्वेष पसरवून देशातील बंधुभाव आणि एकात्मतेच्या भावनेला धक्का पोहचविणे, हा एकमेव अजेंडा घेऊन एमआयएम पक्षाचे ओवेसी बंधू देशात विघातक कृत्य करत आहेत. फाळणीनंतर हैदराबादसहित संपूर्ण मराठवाडा पाकिस्तानात सामील व्हावा या मागणीसाठीच या पक्षाची निर्मिती झाली होती. त्यामुळे या पक्षावर निजमशाहीच्या विचारांचा पगडा अजूनही मजबूत आहे.
मात्र हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर चालणारा देश आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी बाबासाहेबांचे नाव घेऊन आंबेडकरी जनतेला भुरळ पडण्याचा व्यर्थ प्रयत्न ओवेसी करत आहे. मात्र त्याचा खरा चेहरा आंबेडकरी जनतेने ओळखला असून ते त्याच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
ओवेसी यांच्या विषारी वक्तव्यामुळे यापूर्वीही देशात दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा देश विघातक वृत्तीवर कडक कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले आहे. आणि त्याच भीतीतून ओवेसींचा स्वतःवरील तोल ढासळला आहे.
ज्या प्रकारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कडक धोरणामुळे निजाम आणि रझाकारला पळून जावे लागले होते. तशी वेळ आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल तर ओवेसी बंधूंनी अशाप्रकारची देश विघातक विधाने करू नयेत, असा इशारा खासदार साबळे यांनी यावेळी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group