पिंपरी (Pclive7.com):- सिध्दयोगी गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे १ एप्रिल २०२६ रोजी भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण, शिष्य परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना माऊली महाराज वाळुंजकर यांनी परमपूज्य परमहंस श्री भालचंद्र महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने लाभलेले आयुष्य लोककल्याणासाठी अर्पण केल्याचे सांगितले. यामुळे आत्मिक समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंत गडकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. ‘बाबा अहंकार निशी घनदाट | गुरु वचनी फुटली पहाट…’ या अभंगावर आधारित कीर्तनाने उपस्थितांना अध्यात्मिक संदेश दिला. तसेच ह.भ.प. पूनमताई नळकांडे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रमही पार पडला. समाजप्रबोधन करताना माऊली महाराजांनी सध्याच्या बुवाबाजी व भपकेगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. “गुरु स्वीकारताना तो आत्मज्ञानी, राजयोगी व ब्रह्मानंदात विलीन आहे का, याची खात्री करूनच त्याला शरण जावे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. सलग दोन दिवस आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे १५० जणांनी रक्तदान केले. होम-हवन करण्यात आले तसेच गुरुवर्य जय बाबांची फळांनी तुला करण्यात आली. यानंतर माऊली महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सुमारे ५ हजारांहून अधिक भक्तांना अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, दत्तात्रय वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पीसीएमटीचे माजी चेअरमन संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, नगरसेविका प्रियंका कुदळे, माजी शिक्षण मंडळ सभापती श्रीरंग शिंदे, माजी नगरसेविका मीनाताई नानेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे, अभिजित वाघेरे आणि वैष्णवी राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भालचंद्र महाराज आश्रम कणकवली, सोहम सिद्ध दत्त व भालचंद्र महाराज आश्रम वाघोली तसेच विविध क्षेत्रांतील भक्तगण व शिष्य परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.



















Join Our Whatsapp Group