पाठपुराव्याला यश: महाराष्ट्र मंडळ लंडनला जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून ५ कोटींचा निधी वर्ग!
आमदार जगताप यांचे पिंपरी-चिंचवड आणि लंडनमधील मराठी बांधवांकडून कौतुक!
पिंपरी (Pclive7.com):- युनायटेड किंगडम (यूके) मधील मराठी बांधवांचे हक्काचे आणि प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या संस्थेच्या वास्तूची जागा “फ्री होल्ड” करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी परकीय चलनाद्वारे वितरित केला आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले आहे असे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे आमदार शंकर जगताप यांना दिली आहे.


मराठी संस्कृतीच्या जतनाला बळ मिळणार..
महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून लंडनमध्ये मराठी सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मराठी भाषेचे वर्ग चालवले जातात. आता हक्काची जागा मिळाल्यामुळे तिथे मराठी संस्कृतीचे संवर्धन अधिक जोमाने करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परदेशातील मराठी बांधवांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याचे पिंपरी-चिंचवड आणि लंडनमधील मराठी वर्तुळातून कौतुक होत आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या आपल्या मराठी बांधवांसाठी ‘महाराष्ट्र मंडळ’ हे केवळ एक ठिकाण नसून, सातासमुद्रापार आपली संस्कृती जपणारे ते एक हक्काचे घर आहे. या मंडळाला हक्काची जागा मिळावी, ही तिथल्या मराठी समुदायाची अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा करताना, राज्याचे मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. हा निधी म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून, मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा जगभरात प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने दिलेले पाठबळ आहे. आता लंडनच्या भूमीवर आपली मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलेल आणि भावी पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवेल, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”
– शंकर जगताप
(आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ)




















Join Our Whatsapp Group