पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी, दापोडी व काळेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे १३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, विषारी दारूमुळे झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ अपघात नसून अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या बेकायदेशीर कारवायांचा परिणाम असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

मनसेने या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून विषारी दारूच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील अवैध दारू विक्री व हातभट्ट्यांना अभय देणाऱ्या अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन सहाय्य मिळावे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष धाडसत्र आणि स्टिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमित गस्त, धाडी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी राजू साळवे, चंद्रकांत भाऊ दानवले, रुपेश पटेकर, विनोद भंडारी, ॲलेक्स अप्पा मोझस, सागर भोकरे, मनोज महाजन आणि पर्वेश शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group