विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठपुराव्याला यश; सॉईल टेस्टिंगला सुरुवात
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसरातील नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस मार्गावरील PK चौक येथे होत असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दररोज मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी तत्कालीन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे या ठिकाणी VUP अंडरपास पूल उभारण्याची मागणी केली होती.

हिंजवडी, वाकड, पुणे तसेच भोसरी, चाकण आणि खेड औद्योगिक परिसराकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांची या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. परिसरातील वाढते बांधकाम प्रकल्प, वाढती वाहनसंख्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पिके चौकातील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीमुक्तीसाठी अंडरपास पूल अत्यावश्यक असल्याचे नाना काटे यांनी सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

अखेर नाना काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पिके चौकातील प्रस्तावित VUP अंडरपास पुलाच्या कामासाठी आज ट्रायल बीट मारण्यात आली असून सॉईल टेस्टिंगच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बीआरटीएस स्थापत्य विभागाचे अधिकारी तसेच इन्फ्राकिंग या सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकल्पाची माहिती नाना काटे यांनी जाणून घेतली.

संबंधित पुलाचे काम करताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे तसेच काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महानगरपालिका बीआरटीएस स्थापत्य विभागाचे उपअभियंता राहुल जन्नू, कनिष्ठ अभियंता अमोल पाचंगे, संजय नाईक तसेच इन्फ्राकिंग कंपनीचे अभियंता रणजीत कोळे, प्रवीण गुंजाळ आणि कल्पेश कोळे उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group