विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर
पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मृतांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पात्रतेनुसार महापालिकेत नोकरी देण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी राज्यातील अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाईचा इशारा दिला. “पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व ठिकाणचे अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले जातील. अशा बेकायदा धंद्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही,” असे ते म्हणाले. यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “पोलिसांचे अभय असल्याशिवाय असे प्रकार होऊ शकत नाहीत. याआधीही अशा घटना घडल्या असतील, मात्र एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने हा प्रकार समोर आला,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी आणि संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करायला हवी होती. मात्र ते तेथे आले नाहीत. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत केला जाणार असून प्रत्येकाची चौकशी केली जाईल. चौकशीत कोण वरिष्ठ आणि कोण कनिष्ठ याचा विचार केला जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून अवैध दारू निर्मिती, विक्री आणि त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. मृतांचा आकडा वाढल्याने या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
Tags: Girish Mahajan




















Join Our Whatsapp Group