पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आता सीआयडीने हाती घेतली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडीचे विशेष पथक शनिवारी दापोडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

सकाळी १० वाजल्यापासून सीआयडीचे अधिकारी तब्बल साडेसात तास पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, पुरावे आणि तपासाची माहिती ताब्यात घेतली. तसेच काही आरोपींनाही सोबत घेऊन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पथक पुण्यातील सीआयडी कार्यालयाकडे रवाना झाले.

फुगेवाडी परिसरात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी योगेश वानखेडेसह कर्नलसिंग विरखा, गुरमीतसिंग विरखा आणि राधेश्याम प्रजापती यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणात दापोडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. तपास सीआयडीकडे वर्ग झाल्याने संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विषारी दारूचा पुरवठा, उत्पादन आणि वितरण साखळीचा तपास आता सीआयडीमार्फत अधिक व्यापक पद्धतीने केला जाणार आहे.




















Join Our Whatsapp Group