पिंपरी (Pclive7.com):- सांगवी पोलिसांनी तत्परता आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या दीड तासात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, काटेपुरम सोसायटी परिसरातील १७ वर्षीय मुलगी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडून रिक्षाने मुंबईकडे गेली होती. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास सुमारे तासाभराने आली. त्यांनी परिसरात शोधाशोध केल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच सुट्टीवर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाईट ड्युटीवरील पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संबंधित मुलगी मुंबईतील दादर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सांगवी पोलिसांनी दादर येथील भोईवाडा पोलीस ठाण्याशी समन्वय साधून कारवाई केली. पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मुलीचा शोध घेण्यात यश आले आणि तिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
मानसिक तणावातून घर सोडून गेलेल्या या मुलीला पोलिसांनी सुरक्षितपणे शोधून काढत तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे सांगवी पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
Tags: Sangavi Police



















Join Our Whatsapp Group