पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दहा लाखांहून अधिक किमतीचे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दुचाकी आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई रविवार (दि. २८) पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व्हिस रोडवर सुदामाचे पोहे हॉटेलसमोर करण्यात आली. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस शिपाई रणधीर माने यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आर्यन रविंद्र यादव (२०, रा. पुणे) आणि शोएब शकिल शेख ऊर्फ वस्ताद (२५, रा. रविवार पेठ, पुणे) यांनाvअटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सीएनजी पंपाशेजारी एमडी ड्रग्जची विक्री करण्याच्या उद्देशाने आले होते. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत १० लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचे ९८.५६ ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक दुचाकी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीत हे ड्रग्ज गणेश पेठ येथील शोएब शेख याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले. दापोडी पोलिस तपास करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group