पिंपरी (Pclive7.com):- १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही शहरातील मोठ्या संख्येने वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी बसवलेली नसल्याने परिवहन विभागाने उद्यापासून (१ जुलै) कडक दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात ३१ डिसेंबर २०१९ अखेर नोंदणीकृत असलेल्या सुमारे १४ लाख ६७ हजार वाहनांपैकी केवळ ५ लाख २६ हजार वाहनांवरच एचएसआरपी बसवण्यात आली आहे. तर तब्बल ८ लाख ३९ हजार वाहनधारकांनी अद्याप यासाठी नोंदणीही केलेली नाही.
वाहनांची सुरक्षा वाढवणे, वाहनांची ओळख अधिक सुरक्षित करणे तसेच बनावट नंबरप्लेटच्या वापराला आळा घालणे या उद्देशाने केंद्र सरकारने एचएसआरपी प्रणाली बंधनकारक केली आहे. या नंबरप्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्यामुळे वाहन चोरी किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा मागोवा घेणे अधिक सोपे होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी वाहनधारकांना तातडीने एचएसआरपी बसवण्याचे आवाहन केले असून, १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर एचएसआरपी बसवण्यासाठी शहरातील अधिकृत केंद्रांवर वाहनधारकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहनधारकांनी विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group