चिखली (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “गांधर्व मंच” आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला ग.दि.मा. नाट्यगृह, निगडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्नता लाभली. संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव वर्ष आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या १२५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य शरदचंद्र पवार, खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर “भक्ती सिम्फनी” या संत अभंगांवर आधारित भारतीय व पाश्चात्य वाद्यांच्या सुरेल संगमातून साकारलेल्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. “सुंदर ते ध्यान”, “विष्णुमय जग”, “देवाचिये द्वारी”, “ओम नमो ज्ञानेश्वरा” आदी अभंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

या स्पर्धेत संतरचित अभंग गायन, शास्त्रीय गायन, तबला सोलोवादन आणि पखवाज सोलोवादन या विभागांचा समावेश होता. भारतातील विविध राज्यांसह परदेशातील चार देशांतील एकूण ५७९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, तर अंतिम फेरीसाठी २३४ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरी चिखली येथील संतपीठात पार पडली असून त्यातून ६४ स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्रास्ताविकात संतपीठाचे संचालक अभय टिळक यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संतांच्या विचारांचा वारसा संतपीठाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. डॉ. सदानंद मोरे यांनी वारकरी संप्रदाय हा कला आणि ज्ञानाचा संगम असल्याचे नमूद करत या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. खासदार श्रीरंग बारणे यांनी संतपरंपरेचे विचार समाजासाठी आजही मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
यावेळी अवधूत गुप्ते यांनी आपल्या बालपणीच्या सांगीतिक आठवणींना उजाळा देत संतपीठाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार विश्वास जाधव यांनी मंडळाच्या सांगीतिक परंपरेची माहिती देत स्पर्धा आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
अध्यक्षीय भाषणात शरदचंद्र पवार यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्राण असल्याचे सांगत वारकरी परंपरेने सामाजिक लोकशाहीची पायाभरणी केल्याचे प्रतिपादन केले. ज्ञानेश्वरीमुळे ज्ञानाचे लोकशाहीकरण झाले, तर तुकाराम महाराजांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. या संतपरंपरेसोबत गांधर्व परंपरेने कलेचे लोकशाहीकरण केल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राची खरी ओळख ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृतीच्या अखंड परंपरेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन संतपीठाच्या वतीने करण्यात आले. प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.




















Join Our Whatsapp Group