उड्डाणपूल संपूर्ण शहरासाठी ठरणार ‘माईलस्टोन’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या ‘डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाच्या’ कामाने आता अत्यंत निर्णायक टप्पा गाठला आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली असून रेल्वे मार्गावरील सर्वात महत्त्वाचे व आव्हानात्मक असणारे स्टील गर्डर बसविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हा उड्डाणपूल पिंपरीगाव व बाजारपेठ परिसरासह संपूर्ण शहरासाठी “माईलस्टोन’ रणार असल्याचा विश्वास युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सुमारे १,२९० मीटर लांबीच्या या भव्य उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सन २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, सुरुवातीच्या काळात वृक्षतोड, विविध विभागांच्या तांत्रिक परवानग्या, संरक्षण विभागाची जागा आणि रेल्वे प्रशासनाची मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया यामुळे या कामात अनेक कायदेशीर व तांत्रिक अडथळे आले. परिणामी प्रकल्पाला काहीसा विलंब झाला. मात्र, महापालिकेने या सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात करत आता प्रकल्प पूर्णत्वाकडे नेला आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीतील सर्वात तांत्रिक आणि जटिल भाग म्हणजे रेल्वे क्रॉसिंगवरील स्टील गर्डर बसवणे हा होता. हे काम अत्यंत सुरक्षिततेने पार पाडण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त समन्वयाने विशेष ‘मेगा ब्लॉक’ घेतले जात आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दररोज हे अवजड गर्डर निश्चित जागेवर बसवून त्यांची जोडणी (लाँचिंग) करण्याचे काम सुरू आहे. गर्डर बसवण्याचे काम पूर्ण होताच, त्यावर स्लॅब टाकणे, डांबरीकरण करणे आणि अंतिम फिनिशिंगची कामे तातडीने हाती घेऊन ती जलदगतीने पूर्ण केली जाणार आहेत.

युवा नेते ऋषिकेश वाघेरे यांच्याकडून या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना या पुलासाठी भूतकाळात झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची आठवण करून दिली. ऋषिकेश वाघेरे म्हणाले, “या परिसरातील रेल्वे फाटक कायमचे बंद व्हावे आणि नागरिकांची कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्यापासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यानंतर माजी महापौर संजोग वाघेरे पाटील आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे पाटील यांनीही यासाठी मोठा पाठपुरावा केला. हा संपूर्ण भाग केंद्र सरकारच्या रेल्वे विभाग व संरक्षण विभागाशी संबधित असल्यामुळे त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारचे नागरिकांच्या भेडसवणा-या समस्या मार्गी लावणे, त्या निकाली काढणे आणि विकास सर्वांपर्यंत पोहोचविणे, हे धोरण आहे. या धोरणामुळे संरक्षण मंत्रालयाच्या आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यामुळे या कामाला खरी गती मिळाली. आज हा पूल पूर्णत्वाकडे जात असून, आतापर्यंत सर्वांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश आले आहे.”
“पिंपळे सौदागर, रहाटणी आणि पिंपरी कॅम्प या गजबजलेल्या परिसरातून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी ‘डेअरी फार्म मार्ग’ हा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य दुवा मानला जातो. मात्र, या मार्गावर रेल्वे फाटक असल्यामुळे दररोज हजारो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. दिवसातून अनेकदा फाटक बंद होत असल्याने वाहनचालकांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ आणि महागडे इंधन मोठ्या प्रमाणावर वाया जात होते. आता हा उड्डाणपूल झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह थेट आणि अखंड राहणार असून, परिसरातील कोंडी इतिहासजमा होणार आहे”.– ऋषिकेश संजोग वाघेरे, युवा नेते




















Join Our Whatsapp Group