पिंपरी (Pclive7.com):- श्री समर्थ युवा प्रतिष्ठान व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आलेला ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते विश्वास पटवर्धन प्रस्तुत ‘स्वभाव राशींचे’ हा मनोरंजक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम प्राधिकरण येथील वाढोकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक तथा निमंत्रक अमित गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात अमित गावडे यांनी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद करताना ज्येष्ठांचा अनुभव, प्रेरणा, त्याग आणि समाजासाठी दिलेले योगदान यांचा सन्मान करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. त्यानंतर वृषाली गुर्जर यांनी प्रमुख वक्ते विश्वास पटवर्धन यांचा परिचय करून दिला. यावेळी त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांचाही शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी अमित गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

अध्यक्षीय मनोगतात चंद्रशेखर जोशी यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच प्रमुख वक्ते विश्वास पटवर्धन आणि अमित गावडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख वक्ते विश्वास पटवर्धन यांनी सुंदर चारोळीने आपल्या व्याख्यानाची सुरुवात केली. त्यांनी बारा राशींची वैशिष्ट्ये, त्या राशींशी संबंधित स्वभावगुण, स्त्री-पुरुषांची वैशिष्ट्ये तसेच विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची उदाहरणे चारोळी, कविता आणि विनोदी शैलीतून उलगडून सांगितली. त्यांच्या प्रभावी आणि मिश्किल सादरीकरणामुळे सभागृहात वारंवार हास्याचे फवारे उडत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या सांस्कृतिक प्रमुख ज्योती कानेटकर यांनी केले. उपाध्यक्ष दिलीप गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.





















Join Our Whatsapp Group