पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील एका व्यक्तीला आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने फसवून सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात अज्ञात साधूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित रामचंद्र पाटील (वय ४९, रा. अक्षय चंदन सोसायटी, ब थेरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्ता ते एचडीएफसी बँक, पूर्णानगर, चिंचवड या दरम्यान घडली.
फिर्यादी हे कारने जात असताना एका अनोळखी साधूने त्यांना लिफ्ट मागितली. कारमध्ये बसल्यानंतर त्याने स्वतःला नागा साधू असल्याचे सांगून आपल्या आशीर्वादामुळे सुख-समृद्धी मिळेल, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेण्यास सांगितले. सदर अंगठी डोळ्यांना लावून पुन्हा कारच्या गिअर शिफ्टजवळ ठेवण्याचे नाटक करत साधूने ती स्वतःजवळ ठेवली आणि तेथून पसार झाला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपी साधूचे वय अंदाजे ५० वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट आहे. त्याचा रंग सावळा असून अंगात भगवे वस्त्र, डोक्यावर फेटा आणि हातात मोठे कडे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तो हिंदी भाषेत बोलत होता.
याप्रकरणी चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार व्होनमाने करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group