पिंपरी (Pclive7.com):- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दोन गणेश मंडळांवर शिरगाव-परंदवडी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, ॲम्प्लिफायर आणि वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तरीही दि.२० सप्टेंबर रोजी सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओहार्डे येथील शिवतेज मित्र मंडळ यांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजवल्याचे आढळून आले. त्यामुळे दोन्ही मंडळांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ८ डीजे साऊंड सिस्टीम स्पीकर, २ डीजे मिक्सर, २ ॲम्प्लिफायर मशीन आणि १ वाहन जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, अशोक केंद्रे, महेंद्र सपकाळ, पोलीस अंमलदार दिनकर भुजबळ, प्रशांत भोसले, दत्तप्रसाद चौधरी, रितेश कोळी, काजल आघाव, सुरेश परदेशी, संतोष तांबे, सागर कोळी, लक्ष्मण हेमाडे यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणत्याही मंडळाने उच्च आवाजातील डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम अथवा ध्वनी प्रदूषण करणारी साधने वापरू नयेत, अन्यथा पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे. तसेच डीजे न वाजविता पर्यावरणपूरक आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group