पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील परवाना रद्द झालेली अथवा वैध परवान्याशिवाय धावणारी कचरा वाहतूक वाहने तात्काळ जप्त करून त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात तरस यांनी म्हटले आहे की, शहरातील अनेक कचरा वाहतूक वाहने संबंधित परवाना रद्द असतानाही किंवा आवश्यक वैध परवान्यांशिवाय रस्त्यांवर सर्रास धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

निगडी परिसरात नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर अशा बेकायदेशीर वाहनांकडे दुर्लक्ष करणे हे गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणाचे ठरेल. परवाना रद्द असतानाही ही वाहने रस्त्यावर कशी चालत आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच परवाना रद्द किंवा वैध परवान्याशिवाय चालणारी सर्व कचरा वाहतूक वाहने तात्काळ जप्त करावीत, संबंधित वाहनमालक, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबन व दंडात्मक कारवाई करावी, सर्व वाहनांची परवाना पडताळणी करून बेकायदेशीर वाहनांची यादी जाहीर करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात अशा घटनांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे.

















Join Our Whatsapp Group