पिंपरी (Pclive7.com):- जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा पिंपरी चिंचवड शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शिवसैनिकांनी निदर्शने करण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक सचिन भोसले, निलेश बारणे, गजानन चिंचवडे, रोमी संधू, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, वारंवार पाकिस्तानकडून असे हल्ले होत आहेत. काल झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय. या पाकिस्तानचा खात्मा आता केला पाहिजे. संपूर्ण देशातून पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. छुप्या पध्दतीने हल्ला करून आपल्या जवानांचे घेतलेले बळीचा बदला घेतला पाहिजे. सरकारने देखील संपूर्ण देशवासियांच्या भावना ओळखून पाकिस्तानने केलेल्या या कृत्याचे सडेतोड उत्तर दिले पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्यावतीने खासदार बारणे यांनी केली.
वंदे मातरम्, भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचं करायचं का..? खाली डोकं वर पाय.., पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देऊन पाकिस्तानच्या झेंड्याचे दहण करण्यात आले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.






















Join Our Whatsapp Group