पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुत्र पार्थ पवार यांच्या प्रचाराची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज काँग्रेस आणि शेकापच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्या (रविवारी) होणाऱ्या सभेच्या ठिकाणीही जाऊन पाहणी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहराचा भरभरून विकास करूनही महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. निवडणुकीच्या तोंडावर जवळच्या शिलेदारांनीच भाजपात प्रवेश करून दगाफटका दिला होता. आता येत्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे पुत्र पार्थ पवार मावळच्या रिंगणात उतरले आहेत. म्हणूनच अजित पवारांना पार्थ यांच्या विजयासाठी स्वत:च्या हातात प्रचाराची सूत्रे घेतली आहेत. रविवारी (दि.१७ रोजी) चिंचवड येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सभेस मित्रपक्षांनी उपस्थित राहावे यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आणि शेकापच्या पदाधिकाऱ्यांची आज भेट घेतली.

राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची सुरुवात रविवारी दि.१७ मार्च रोजी चिंचवडमधून होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश व शहर पातळीवरील पदाधिकारी व मित्र पक्षांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या पूर्व तयारीसाठी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची पिंपळे निलख येथे साठे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, युवानेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, नगरसेवक विक्रांत लांडे, राष्ट्रवादी शहर प्रवक्ता फजल शेख, मयुर कलाटे, काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस मयुर जैसवाल, तसेच संतोष साठे, काळूशेठ नांदगुडे, नंदकिशोर रणदिवे, सुभेराज साठे, संजय साठे, शिरीष साठे, विजय जगताप, सुरेश साठे, संकेत जगताप व साठे कुटुंबिय उपस्थित होते.
त्यानंतर अजित पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पिंपरी चिंचवडमधील कार्यालयास भेट दिली. यावेळी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष हरिष मोरे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group