पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची आज (गुरुवारी) गुप्त भेट झाली आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याचा उलघडा झाला नसला तरी शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अँड. सचिन पटवर्धन यांच्या माध्यमातून पिंपळेगुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ‘चंद्ररंग’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून बैठकीतील तपशील मात्र गुप्त ठेवण्यात आला आहे. शहरातील या दोन्ही नेत्यांची भेट म्हणजे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी राजकीय घडामोड मानली जात असून संभ्रमात असलेल्या युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात जगताप सहभागी झाले नव्हते. बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर होता. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
बारणे आणि जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र युती धर्माचे पालन करू अशी हमी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तर, बारणे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी मित्र पक्षाचे काम करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार सचिन पटवर्धन यांच्या पुढाकाराने बारणे आणि जगताप यांची आज भेट झाली. पटवर्धन यांची शिष्ठाई कामाला आली असून जगताप यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बारणे आणि जगताप यांच्यात आज झालेल्या भेटीमुळे मावळात युतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बारणे आणि जगताप यांच्यात दिलजमाई झाली तर त्याचा फायदा युतीलाच होणार आहे. मावळच्या रणसंग्रामात बारणेंचा मार्ग सुकर होणार आहे. दरम्यान या बैठकीत नेमकं काय झाले याचा उलघडा झाला नसला तरी येत्या दि.२ एप्रिल रोजी या दोन दिग्गजांमध्ये समेट घडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून समजते.






















Join Our Whatsapp Group