पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण मतदारसंघात बारणे यांनी प्रचाराची एक फेरी पुर्ण केली असून मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावेळेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले होते. यावेळेस तब्बल २ लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होणार असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, किरण मोटे, रोमी संधू, सरिता साने आदी उपस्थित होते.
श्रीरंग बारणे म्हणाले की, अनेक वर्षे सामाजिक, राजकीय काम करतोय. पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊन संधी दिली आहे. यावेळेसही उमेदवारी देऊन पक्षाने विश्वास टाकला आहे. मतदारसंघात प्रचार सुरू केलाय. केंद्र आणि राज्य सरकारशी निगडीत या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत. यावेळेसही सक्षम सरकार पुन्हा यावे यासाठी प्रयत्न करतोयं. प्रचाराची एक फेरी पुर्ण झाली आहे. उरण, कर्जत, पनवेल येथे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकुर, मनोहर भोईर यांनी ही निवडणुक हातात घेतली आहे. कर्जतमध्ये महेंद्रसिंग थोरवे, मावळ मधून बाळा भेगडे माझ्या पाठीशी उभे आहेत. पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना देखील भेटलो आहे. महायुतीला सहकार्य करावे अशी विनंती त्यांना केलीयं. झाल्यागेल्या आरोप प्रत्यारोपांना पुर्णविराम देण्यासाठी भेटलो आहे. आमच्यातील हेव्यादाव्यामुळे विरोधकांना फायदा होऊ नये, यासाठी मी स्वत:हून पुढाकार घेतला आहे.
या निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवानेते आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पनवेल परिसरात होऊ शकते. प्रचारा दरम्यान मी टिका करण्यापेक्षा विकासकामांवर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. संसदेत सर्वाधिक प्रश्न मी मांडले आहेत, हे जनतेला चांगले माहित आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले होते. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमधून हद्दपार झाली आहे. मावळात नामोनिशान मिटत आला आहे. उरण, कर्जतमध्ये राष्ट्रवादीची ताकद संपत आलीयं. यावरून ६ मतदार संघातील मतांचा आकडा समोर येत आहे. शेकपाच्या जिवावर राष्ट्रवादी निवडणुक लढवत आहे. त्यांची ताकद मर्यादित आहे. मावळ लोकसभेत सध्या युतीची ताकद प्रचंड वाढली आहे. किमान २ लाखांच्या मताधिक्क्याने मी विजयी होणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group