पिंपरी (Pclive7.com):- इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. आज (गुरुवार दि.१८) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील रॉयल ग्रीन फेज १ सोसायटीमध्ये ही घटना घडली.
रोहित बाबुराव पाटील (वय २८ रा.रहाटणी मुळगाव धुळे) असं आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याची नाव आहे. तो हिंजवडी येथील एका कंपनीत कामाला होता.
रोहित इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून रहाटणी येथे त्याच्या भावासोबत राहत होता. गुरुवारी दुपारी रोहितचा भाऊ कामाला गेला होता. तर त्याची वहिनी घरात होती. दरम्यान तो घरातून इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील गच्चीवर आला व तेथून खाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. त्याला एक दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्या नैराशातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.