पुणे (Pclive7.com):- पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४) मुख्यमंत्री यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुन्हा रंगली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गिरीश बापट हे खासदारपदी निवडून आल्याने त्यांना आमदार पदाचा तसेच पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यानुसार मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्याकडे यावी, यासाठी शहरातील अनेक आमदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले होते. अनेक आमदारांची नावे चर्चेत होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या चार महिन्यांसाठी पुण्यातून नाव दिले तर एका आमदाराच्या पारड्यात झुकते माप दिल्यास रुसवे फुगवे होऊ शकतात. अशातच गटातटाचे राजकारण निर्माण होऊ शकते, अशी शक्यता धरून शहरातून पालकमंत्री न देताना बाहेरील जिल्ह्यातील मंत्र्यास पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. परंतू महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्र्याची जबाबदारी देण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group