मावळ (Pclive7.com):- भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उद्या (रविवार) दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. आता त्यांना कोणतं मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान याही वेळेस पिंपरी-चिंचवड मधील दिग्गजांना डावलल्यामुळे शहरवासीयांच्या पदरी पुन्हा आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबत फोन करून बाळा भेगडे यांना माहिती दिली असल्याचे समजते आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भेगडे यांचे फोन करून अभिनंदन केल्याची माहिती समोर येत आहे.
मावळ विधानसभा मतदार संघातून बाळा भेगडे हे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बाळा भेगडे संघाचे जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते सध्या पुण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पुणे जिल्ह्यात भरीव कामगिरी केली आहे. जिल्ह्यात कमल फुलवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नगरपरिषद असो किंवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अनेक वर्षापासून मावळ विधानसभेत मंत्रिपद यावे अशी भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होती. आता बाळा भेगडे यांच्या रूपाने कार्यकर्त्यांची ही इच्छा पूर्ण होत असून मावळ परिसरात अतिशय उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातून पवार कुटुंबाला हद्दपार करण्यात मोलाचा वाटा उचलणारे आमदार लक्ष्मण जगताप तसेच महेश लांडगे यांना गेल्या साडेचार वर्षात मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. रिक्त झालेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आमदार जगताप यांची वर्णी लागेल अशी शक्यता होती. मात्र त्याही वेळेस त्यांना डावलण्यात आले. आता बाळा भेगडे यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रीपद मिळतंय खरं, परंतु पिंपरी चिंचवडकरांचा वाट्याला काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.